सातारा : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना सातारा जिल्हा न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का आहे.
सातारा न्यायालयासमोर आज गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. सरकारी वकील म्हणाले, सरकार पक्षाला मदत करण्यासाठी आम्ही राजेंद्र निकम यांच्यातर्फे हजर होतो. आम्ही वकिलपत्र दिलं. न्यायालयासमोर आम्ही बाजू मांडली. जी घटना घडलेली आहे. ही अतिशय निंदनीय असून त्याचा पंचनामा होणं हे अत्यंत गरजेचं आहे, असं मी कोर्टाला सांगितलं आहे. न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली. त्यानुसार मेहरबान न्यायालयाने सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपीचं वागणं कशाप्रकारचं आहे. याबाबत आम्ही मुद्दा मांडला. मात्र, मी अशाप्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये, असं सदावर्ते म्हणाले. परंतु त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे. ते न्यायालयासमोर आम्ही पूर्णपणे मांडलं. यामध्ये व्हॉईस सॅम्पल घेणे गरजेचं आहे आणि घटनास्थळी पंचनामा होणं देखील महत्वाचे आहे. आरोपीला हे वक्तव्य करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याचा तपास होणं महत्त्वाचं आहे.
दोन वर्षांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना निर्माण झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टात आज हजर करण्यात आले असता ४ दिवसांसाठी पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.