धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर


मुंबई : सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धंनजय मुंडे यांना काल हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना त्वरित ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

काल, मंगळवारी राष्ट्रवादी धंनजय मुंडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्वरित ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु असून प्रकृती आता स्थिर आहे. पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास आदी मुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे. काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ब्रीचकँडी रुग्णालयात जाऊन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली, प्रकृतीची चौकशी केली व लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून तब्येतीची माहिती घेतली.