दीनदयाळ उपाध्याय पुरस्काराबद्दल हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्हा परिषदेचे अभिनंदन

कागल, : सन २०२० -२१ वर्षाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष बजरंग पाटील,  उपाध्यक्ष सतीश पाटील,, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, माजी अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.

या अभियानात महाराष्ट्रात प्रथम आलेल्या राहाता,  मालवण पंचायत समितीचे व बालस्नेही पंचायत अभियानात राज्यात प्रथम आलेल्या शृंगारवाडी (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचेही मंत्री मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले,  बालकांच्या जगण्याचा, संरक्षणाचा, विकासाचा आणि सहभागीतेचा अंगीकार या मूलभूत तत्वावर बालस्नेही पंचायत प्रकल्प आधारित आहे. लोकसंख्येच्या एकूण ४८ टक्के महिला आहेत,  त्यापैकी शून्य ते १८ वयोगटातील लहान मुला -मुलींची संख्या ३२ टक्के आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सक्षम केल्यासच भारत महासत्ता बनेल. मुलगा -मुलगी भेद मानू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेने पंचायत सशक्तीकरणाच्या दृष्टीने केलेले काम लौकिकास्पद आहे. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यनिहाय पुरस्कार द्यावयाचे होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात प्रथम आली. हेच क्रमांक देशपातळीवर काढले तरीही कोल्हापूर जिल्हा परिषद देशात प्रथम येईल, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले,  ‘बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत हा पथदर्शी प्रकल्प असून कागल तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असल्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. असे पथदर्शी प्रकल्प राबवण्याची गरज आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४८ टक्के महिलांचा सहभाग असून यामध्ये ३२ टक्के लहान मुले, मुली तरुण-तरुणी येतात, त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

यावेळी युनिसेफचे राज्य सल्लागार प्रमोद काळेकर यांनीही मार्गदर्शन केले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ‘बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत पथदर्शी प्रकल्पाच्या लोगो’चे अनावरण तसेच बालस्नेही व लिंग भाव अनुकूल पंचायत पथदर्शी प्रकल्प पुस्तिकेचे प्रकाशन झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर,  प्रकल्प अधिकारी श्रीमती विद्या लांडगे आदी उपस्थित होते.        

 स्वागत व प्रास्ताविक कागल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशील संसारे यांनी केले. सूत्रसंचालन विस्ताराधिकारी सारिका कासोटे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी यांनी मानले.