न्यू पॉलिटेक्निकमध्ये विविध उपक्रम

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उंचगाव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये दि. ८ व ९ एप्रिल रोजी राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग व सर्किट मॅनिया असे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे उदघाटन ‘इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन’च्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे चेअरमन डॉ. रणजित सावंत यांचे हस्ते झाले.

उपक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. महेश घोसाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या परिषदेत 22 तंत्रनिकेतन मधून एकूण 160 ग्रुप सहभागी झाल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत तसेच कोणती कौशल्ये स्वत:मध्ये रुजवली पाहिजेत, हे विशद केले. न्यू पॉलिटेक्निकमध्ये या अनुषंगानेच विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबविले जातील, अशी ग्वाही दिली. डॉ. सावंत यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी नेहमी चौकस राहिल्याने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील. त्याचबरोबर सध्याच्या स्पर्धेच्या युगात उत्तम गुणवत्ता असलेले विद्यार्थी आणि शिक्षण संस्थाच टिकून राहतील, असे नमूद केले.

संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी न्यू पॉलिटेक्निकला अशा उपक्रमांसाठी संपूर्ण पाठिंबा राहील, असा विश्वास दिला. यावेळी संस्थेचे संचालक विनय पाटील, संचालिका सौ. सविता पाटील उपस्थित होते. उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. एम. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आवर्जून सहभागी झाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो. याप्रसंगी न्यू पॉलिटेक्निकचे सिव्हिल विभागाचे माजी विद्यार्थी आणि ‘इंजिनिअर्स व आर्किटेक्ट्स असोसिएशन कोल्हापूर’चे अध्यक्ष अजय कोराणे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी न्यू पॉलिटेक्निकप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमात विविध कॉलेजमधून उत्स्फूर्तपणे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रा. शामली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.