मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल, शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. याचबरोबर न्यायालयाने इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर जेजेमध्ये सुमारे चार तास त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर राज्यभर तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यासाठी सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान वकील गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्या, अशी मागणी केली होती.
यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आरोपीवरील कलम गंभीर असून कामगारांना भडकावण्याबरोबरच इतर आरोपांची चौकशी करण्यासाठी तसेच सदावर्ते यांच्याबरोबरच इतर सक्रीयरित्या समावेश असलेल्यांची चौकशी करण्यासाठी १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. सदावर्ते यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केलं असून कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाबरोबरच हे हल्लेखोर खरंच एसटी कामगार होते की भाडोत्री होते, याचाही तपास करण्याचा असल्याचे सांगितले.
यावेळी सदावर्ते यांचे वकील अॅड महेश वासवानी म्हणाले की, घटनेवेळी सदावर्ते तिथे नव्हते. ते मॅट कोर्टात होते. एका पत्रकाराने त्यांना तुमची भूमिका काय असे विचारता त्यांनी शांततेचं आवाहन केलं होतं. 92 हजार कर्मचाऱ्यांच्या या केसमध्ये ते यशस्वी झाले, त्याचा राग म्हणून सरकार हे करतंय. सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीस देखील देण्यात आली नाही. यातूनच सरकारचा रोष बघायला मिळत आहे. माझ्याकडे घटनास्थळीचे सीसीटीव्ही आहेत. मात्र कुठेही सदावर्ते नाहीत, असं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटलं आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.