भारतात XE व्हॅॅरिएन्टचा शिरकाव : बीएमसीचे वृत्त

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या XE variant ने शिरकाव केल्याचे वृत्त मुंबई महापालिकेने (BMC) ने दिले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. मुंबईत या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिल्याच्या काही तासांतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने XE रुग्णाबाबत माहिती दिली आहे.

मुंबईत जीनोम सिक्वेसिंगसाठी काही नमुने पाठवण्यात आले होते. याच्या रिपोर्टनुसार यामध्ये XE आणि Kappa variant  या दोन नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं निदान झालं. XE आणि Kappa variant  यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

10 फेब्रुवारीला एक महिला दक्षिण आफ्रिकेहून भारतात आली होती. तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. पण 2 मार्चला नियमित चाचणीत मात्र तिचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं.

XE हा ओमिक्रॉनचे (Omicron) सबव्हेरिएंट  BA.1 आणि BA.2 या प्रकारातून बनलेला आहे. म्हणजे तो recombinant आहे. 19 जानेवारी रोजी सर्वात आधी यूकेमध्ये हा व्हेरिएंट आढळला. WHO च्या प्राथमिक अंदाजानुसार, XE हा ओमिक्रॉनच्या BA.2  पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे.

राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, “कोरोनाच्या XE व्हेरिएंटबाबत NIV आणि कस्तुरबा हॉस्पिटलकडून अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात घाबरण्याची गरज नाही. हा XE व्हेरिएंटबाबतीत केंद्राकडून आम्हाला यासंदर्भात कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.”