विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी शिरोली ग्रामस्थांची शाळेवर दगडफेक

शिरोली : शिरोलीतील  एका दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत आज ग्रामस्थांनी शाळेवर मूक मोर्चा काढला होता. मोर्चा शाळेजवळ आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली.

शिरोली येथील हेरंब बुडकर या विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. तो शिरोलीतील सिम्बोलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. शुक्रवारी फुटबॉल खेळत असताना हेरंबचा मारलेला बॉल एका मुलीला लागला होता. यावरून मुख्याध्यापकांनी हेरंब याचा पाणउतारा केला होता. आजोबा रामचंद्र बुडकर यांच्यासमोर त्याला अपमानित केल्याने तसेच तुला शाळेतून काढून टाकतो, तू सोमवारपासून शाळेला येऊ नकोस, असे सांगितले होते. नैराश्य आलेल्या हेरंब याने घरी आत्महत्या केली होती. अपमानास्पद भाषाही वापरल्यानेच नाराज झालेल्या हेरंब याने आत्महत्या केल्याचा आरोप पालकांनी केला होता.

या प्रकरणात सिमबॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होऊनही अद्याप कुठलीच कारवाई न झाल्याने तसेच आर्यनला न्याय मिळाला पाहिजे यासाठी शिरोलीतील हजारो नागरिकांनी शाळेवर मोर्चा काढला होता. या मोर्चा शाळेजवळ मोर्चा आल्यावर दरम्यान संतप्त जमावाने शाळेवर दगडफेक केली. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अटक न केल्यास पोलीस ठाण्यावर आंदोलन कऱण्याचा इशाराही दिला आहे.