अनेक वर्षे प्रलंबित सुतारवाडीतील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी !

    गगनबावडा (प्रतिनिधी) : वाडी हा केंद्रबिंदू मानून गावातील मूलभूत गरजा व गावातील अनेक कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही विकास कामांसाठी सतत प्रयत्नशील असून जाहीरनाम्यात उल्लेख केलेली विकास कामे करून वचनपूर्ती करणारच, असे प्रतिपादन सांगसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन बंडू आप्पा पडवळ यांनी केले. सैतवडे पैकी सुतारवाडी येथील रस्ता उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

    गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुतारवाडीचा जिव्हाळ्याचा व बरेच दिवस रेंगाळत वादाच्या भोवऱ्यात पडलेला सुतारवाडी रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागला. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून वाहतुकीस खुला झाला आहे.

     आमदार पी. एन. पाटील यांच्या फंडातून दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आनंदराव गायकवाड, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आनंदराव गायकवाड यांनी या रस्त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून तहशिलदार संगमेश कोडे यांच्या सहकार्याने तोडगा काढून रस्ता पूर्ण करण्यात आला.

       या रस्त्याच्या उद्घाटनावेळी आनंदराव गायकवाड, मनोहर बोरये, भिवाजी वरेकर, विशाल पडवळ, विलास पडवळ, शरद पवार, बाळू भारती, रमेश सुतार, आप्पा सुतार, विष्णू सुतार, बाजीराव सुतार, तानाजी सुतार, प्रकाश सुतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.