कोल्हापूर : पाच वर्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा पारदर्शी आणि शिस्तबध्द कारभार, तर गेल्या अडीच वर्षात घोटाळे, भ्रष्टाचार यांनी बरबटलेला महाविकास आघाडीचा कारभार यातील फरक राज्यातील जनतेला स्पष्टपणे कळून चुकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी आखलेल्या विकास योजना यामुळे लोकांमध्ये भाजपबद्दलचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदार संघातील निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी व्यक्त केला.
यादवनगर परिसरात भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. जाधव म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून अनेक गोरगरीबांना घरे मिळाली आहेत. झोपडपट्टीतील नागरिकांनाही स्वतःच्या हक्काचे मजबूत घर मिळू लागले आहे. मोफत लसीकरण झाल्याने कोरोना नियंत्रणात आला. गेली अडीच वर्षे केंद्र सरकारच्या माध्यमातून रेशनवर मोफत धान्य मिळत आहे. महिलांसाठी उज्ज्वला योजना, मोफत शिलाई मशिन वाटप, बेटी बचाव-बेटी पढावं, सुकन्या समृध्दी, आयुशमान भारत अशा अनेक योजना यशस्वी करून, जनतेला दिलासा दिला. शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा प्रत्येक स्तरावर मोदी सरकारने दमदार कामगिरी केल्यामुळे, भाजपचा जनाधार वाढत आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
कॉमन मॅनचे बाबा इंदुलकर यांनीही चौफेर टोलेबाजी केली. निवडणुकीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे कॉंग्रेसचे राज्यमंत्री जनतेला गाजर दाखवत आहेत. नेत्यांच्या सोयीस्कर भूमीकेमुळे आजवर कोल्हापूरची हद्दवाढ झाली नाही आणि आता पाच गावांसह हद्दवाढ केली जाईल, असे सांगून जनतेला भुलवण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्र्यांनी आधी त्या चार गावांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी इंदुलकर यांनी केली.
थेट पाईपलाईनचे काम केवळ रखडले नसून, अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुध्दा आहे. पंचगंगेच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. कोरोना काळात जिल्हयात शासकीय खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला. महापालिका स्तरावरील अनेक प्रश्न कायम आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अशोक देसाई, गायत्री राऊत यांच्यासह यादवनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.