मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ करणार्‍या महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवा : समजितसिंह घाटगे

   कोल्हापूर : राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता. न्यायालयातही आरक्षण टिकले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच, भोंगळ कारभारामुळे मराठा आरक्षणाचा बट्टयाबोळ झाला. ओबीसी समाजालाही आरक्षणापासून वंचित रहावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला केवळ स्वतःच्या तुंबडया भरण्यात रस आहे. जनतेच्या प्रश्‍नांची आणि मराठा समाजाच्या आक्रोशाशी त्यांचे काही देणे-घेणे नाही.त्यामुळेच कोल्हापूर उत्तरमधून भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना निवडून देऊन, परिवर्तनाची सुरूवात करूया, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलनजीक कोल्हापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

  घाटगे म्हणाले, मराठा समाजाने शांततेत पण भव्यदिव्य मोर्चे काढले. पण न्यायालयात टिकेल, असे आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. किंबहुना या सरकारला मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचीच इच्छा नाही. प्रत्येक स्तरावर हे सरकार अपयशी झाल्याने पुन्हा एकदा राज्यात भाजप सरकार यावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून भाजपच्या विजयाची नांदी हेाईल, अशी खात्री घाटगे यांनी बोलून दाखवली.

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, सचिन तोडकर, उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम, माणिक पाटील-चुयेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनीही सभेला मोठी गर्दी केली होती.