कोल्हापूर (प्रतिनिधी) : इयत्ता ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाल मानसशास्त्राचा विचार करून शिष्यवृत्तीची परीक्षा किमान ३० एप्रिलपर्यंत घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारा केली आहे.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, मागील शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या सालात कोरोना प्रादुर्भावामुळे तीन वेळा शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलून ती १२ आँगस्ट २०२१ रोजी झाली होती. परीक्षा वेळेत न होता विलंब झाल्याने अनेक विद्याथ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन परीक्षेत त्यांना कमी गुण मिळाले होते .
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या वर्षी म्हणजे सन २०२१-२२ या सालातील इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा वेळेत (फेब्रुवारी मध्ये) होईल अशी विद्यार्थी , पालक व शिक्षकांची मानसिकता होती. २० फेब्रुवारीला जाहीर केलेली तारीख रद्द का केली याचे कारण कळले नाही. मार्च २०२२ संपत आला तरी अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन काहीच झाल्याचे दिसत नाही. परीक्षेचे नियोजन जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये संभ्रम वाढत चालला आहे .
विद्यार्थ्याच्या बाल मानसशास्त्राचा विचार करता शिष्यवृत्ती परीक्षा किमान एप्रिल २०२२ पूर्वी होणे आवश्यक आहे . पुढील शैक्षणिक वर्षात परीक्षा घेणं उचीत होणार नाही , कारण सर्वच विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक तर बदलणारच आणि अनेक विद्यार्थ्यांची शाळाही बदलणार आहे . त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची केलेली तयारी खंडीत होऊन परीक्षेवेळी विपरित परिणाम सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यावर होणार आहे . त्यामुळे विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून चालू शैक्षणिक वर्षातील इ . ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ही कोणत्याही परिस्थीतीत दि. ३० एप्रिपूर्वी घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनाची प्रत शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त व प्राथमिक शिक्षण संचालक यांना पाठवल्या आहेत. निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, जिल्हाध्यक्ष एस के पाटील, शंकर पवार, विद्या कदम, अलका थोरात, पी. आर. पाटील, दिलीप भोई, प्रमिला माने, सुनिल पोवार, अशोक शिवणे, दिगंबर टिपुगडे, भारती चोपडे, प्रेरणा चौगुले, राजश्री पिंगळे, मनिषा गुरव, अशोक खाडे आदींच्या सह्या आहेत.
बालमनाशी खेळ नको
इयत्ता १० वी १२ वी परीक्षा वेळेत होऊ शकतात मग ५ वी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा वेळेत होण्यास काय अडचण आहे? बालमनाशी तारखेचा खेळ न करता ३० एप्रिलपूर्वी परीक्षा होणे आवश्यक असल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.