कागल (प्रतिनिधी) : राजे फौंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या सराव परीक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यातून कागल व कोल्हापूरमध्ये घरोघरी अधिकारी घडून अधिकार्यांचे कागल अशी ओळख व्हावी, असे प्रतिपादन राधानगरीच्या पोलीस निरीक्षक अनुराधा पाटील यांनी केले.
येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य क्षमता चाचणी मोफत सराव परीक्षेवेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढावे. त्यांच्यामध्ये धाडस व आत्मविश्वास निर्माण व्हावा. या हेतूने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या सौजन्याने शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून ही सराव परीक्षा झाली. नामांकित क्लासेसच्या सहकार्याने तज्ज्ञांमार्फत परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती.परिक्षेचा निकाल त्याच ठिकाणी जाहीर केला.
मुख्य परीक्षेची तयारी व सरळ सेवा भरतीमधील विविध पदे याविषयी मार्गदर्शन करताना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक दीपक अतिग्रे म्हणाले, ध्येय ठेवून झपाटून अभ्यास केल्यास स्पर्धा परिक्षेत यश नक्की मिळते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची तयारी,सरळ सेवा भरतीमधील विविध पदे व अभ्यासतंत्र याबाबत मार्गदर्शन केले.
या परीक्षेचे उदघाटन शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले. यावेळी शाहूचे संचालक सचिन मगदूम , प्रा. सुनिल मगदूम, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत मुख्याध्यापक एस. डी. खोत यांनी केले. आभार ए. पी. सारंग यांनी मानले.