मुंबई : सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. तसा काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. ईडीच्या सहाय्याने कुटुंबियांची बदनामी करण्याचं कृत्य हे नीचपणा असून ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही जर का तुमचा पट्टा गळ्यात बांधला असता तर माझ्या कुटुंबीयांवर आच आली नसती. मर्द असशील तर मर्दासारखा ये पुढे. सत्तेचा दुरुपयोग, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात कसला आलाय मर्दपणा? तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करताय, हा नीचपणा आहे
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मला खोटं बोलता येत नाही. विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे जातात. किमान राज्यपाल काय म्हणतायत, ते तरी आपण ऐकून घ्यायला हवं होतं. काल देवेंद्र फडणवीस यांनी विंदा करंदीकर यांची ‘तेच तेच आणि तेच तेच’ कविता ऐकवली तशीच तुम्ही ‘दाऊद एके दाऊद’ करुन दाखवलं. मात्र, तुम्ही राज्यपालांचं भाषण ऐकायला हवं होतं. त्यांना राष्ट्रगीतांला तरी थांबू द्यायला हवं होतं.