कोल्हापुरात मला ठार मारण्याचा कट होता : नितेश राणे

मुंबई :  संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना उपचारांसाठी मला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी मला रुग्णालयातच ठार मारण्याचा कट आखला होता, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केला.

  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवेळी संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे  यांना अटक झाली होती. त्यावेळी सावंतवाडी कारागृहात असताना नितेश राणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर कणकवली जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. छातीत दुखत असल्याने नंतर त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. त्यावेळी मला कोल्हापुरातील रुग्णालयातच मारण्याची योजना आखली होती, असे नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. छातीत दुखत असल्याने अँजिओग्राफी करावी, असा डॉक्टरांचा आग्रह होता. पण मला तशी गरज वाटत नसल्याचे सांगितले. माझा रक्तदाब आणि शुगर लेव्हल कमी असली तरी मला सर्व गोष्टी कळत होत्या. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितले की, तुम्ही सीटी-अँजिओ करून घेऊ नका. तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा कट असल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितल्याचे राणे यांनी सांगितले.