कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोळा महिन्यापूर्वी बोललेलो क्लिप व्हायरल करणाऱ्या शोध प्रवृत्तीना माझा सलाम आहे. या प्रवृत्तींना बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी थेट पाईपलाईनचा केलेला संकल्प आठवतो का? असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांतदादा म्हणाले, सोळा महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाही आमदाराने राजीनामा द्यावा, मी लढतो. हरलो तर मी हिमालयात जातो, असे बोललो होतो. मात्र, आता काही शोध प्रवृत्तीकडून त्यावेळची क्लिप व्हायरल केली जात आहे. त्या प्रवृत्तीना बंटी पाटलांचा संकल्प आठवत नाही का? बंटी पाटील म्हणाले होते की, थेट पाईपलाईनचे पाणी नाही दिले तर विधानसभा लढवणार नाही. त्यांनी विधानसभा लढवली ते हरले. पुन्हा विधानपरिषद लढवली. ते आमदार, मंत्री कसे झाले. आणि थेट पाईपलाईनचे काय झाले?
कागल आणि जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ गेल्या दिवाळीत आम्हाला थेट पाईपलाईनच्या पाण्याने आंघोळ घालणार होते. त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.