कोल्हापूर : थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी प्रशासन भक्कम साथ देणार असून यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळल्यास व्हिडिओ किंवा फोटो काढून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला.
थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. दीड वर्षापासून नागरिकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या चळवळीबाबत जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले. व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले, यापुढे थुंकीबहादरांना अद्दल घडवण्यासाठी हयगय केली जाणार नाही, मग तो सामान्य नागरिक असो किंवा शासकीय कर्मचारी असो, त्याच्यावर गांभीर्याने कारवाई केली जाईल. चळवळीतील संघटनांनी पुढाकार घेऊन चौकाचौकात प्रबोधन करावे याकरिता प्रशासनही सर्वतोपरी मदत करेल.
यावेळी दीपा शिपूरकर यांनी चळवळीत येणाऱ्या अडचणी विषद केल्या. सारिका बकरे यांनी तंबाखू व टीबी नियंत्रण विभागाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले .यावेळेस कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्याधिकारी मनीष पवार तसेच चळवळीचे राहुल राजशेखर, गीता हसुरकर , विजय धर्माधिकारी, डॉ. देवेंद्र रासकर, सुनील हंजे,अनिल कांझर ,सागर बकरे, ललित गांधी आदी प्रमुख उपस्थित होते.