नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

मुंबई : राष्ट्रवादी  कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत कोर्टाने वाढ केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.

  नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पाठदुखीसह व इतर व्याधींचा त्रास होत असल्याची तक्रार होती. मलिक यांनी कोर्टाकडे बेड, खुर्चीची मागणी केली होती. त्यांना तुरुंगात बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

  नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने २३ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. ७ मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची तीन एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे.