कोल्हापूर : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीला जाळल्याप्रकरणी कोल्हापुरातील उचगावमधील निर्दयी पतीला प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सासू सरदारबी चमनशेख आणि सासरा बुडेलाल चमनशेख याना दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शाहिस्था अल्ताफ चमनशेख असं या दुर्दैवी पत्नीचं तर अल्ताफ बुढेलाल चमनशेख असं मुख्य आरोपीच नाव आहे.
कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या उचगाव येथील शाहिस्था बागे हिचा २००७ साली कर्नाटकातील कुडची येथील अल्ताफ चमनशेख याच्याशी विवाह झाला होता. मात्र हे दोघे पती पत्नी आपल्या ३ मुलीसह उंचगाव येथे भाड्याने राहत होते. शाहिस्था हिला लग्नानंतर तीन मुलीच झाल्या आहेत. त्यामुळे मुलगा होत नसल्याच्या कारणावरून अल्ताफ शाहिस्थाशी वारंवार वाद घालत असे. ३० डिसेंबर २०१३ रोजी या दोघांच्यात याच कारणावरून भांडण झाले. यावेळी शाहिस्थाची सासू सासरे आणि नणंद यांनी अल्ताफला भडकवले. आणि रागाच्या भरात अल्ताफने शाहिस्थाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले. यामध्ये ९६ टक्के भाजलेल्या अवस्थेत शाहिस्थाला सीपीआरमध्ये दाखल केले होते. २जानेवारी २०१४ रोजी उपचार सुरू असताना शाहिस्थाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शाहिस्थाच्या नातेवाईकांनी गांधीनगर पोलिसात पती अल्ताफ, सासू सरदारबी, सासरा बुडेलाल चमनशेख आणि नणंद मेहबुबी बदनकरी या चौघाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुनील कांबळे यांनी तपास करून चौघा संशयितांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल होता. गुरुवारी या खटल्याची सुनावणी झाली. प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी केलेला युक्तिवाद, मयत शाहिसताचा मृत्यूपूर्वीचा जबाब आणि इतर साक्षी पुरावे ग्राहय धरून आरोपी अल्ताफ चमनशेख याला पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची तर सासू सरदारबी आणि सासरा बुडेलाल चमनशेख यांना दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तर ननंद महाबुबी तोफिक बदनकारी (रा. कुडची) न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.