बंगळूर : हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा तसेच हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही,. हिजाबवरील बंदी योग्यच असल्याचा निकाल देत, कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.
कर्नाटकात हिजाबवरून मोठा वाद उफाळून आला होता. शाळा, महाविद्यालयांत हिजाब परिधान करून काही विद्यार्थिनी आल्या. त्यांना वर्गामध्ये हिजाब काढून बसण्याची सूचना देण्यात आली; पण विद्यार्थिनींनी त्यास विरोध केला. यावरून वाद निर्माण होऊन आंदोलन पेटले होते. या वादाचे लोन देशभर पोहोचले होते.
हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालयांनी वर्गात प्रवेश नाकारल्याने मंगळूर जिल्ह्यातील सहा विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शाळा, महाविद्यालयांत हिजाब वापरण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती. हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या. दरम्यान, या निर्णयापूर्वी बेंगळुरूमध्ये २१ मार्चपर्यंत न्यायालयाने सर्व प्रकारचे मेळावे, आंदोलनं, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने किंवा उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.