कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. पक्षाकडून सहाजण इच्छुक असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये घेण्यात आल्या. यावेळी दोन दिवसात उमेदवाराचे नाव घोषित करणार असल्याचे जाहीर करण्यात आला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक दोन दिवसापूर्वी जाहीर झाल्याने राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. भारतीय जनता पक्षाकडून सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. माजी नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, दौलत देसाई, पदवीधर संघटन मित्र माणिक पाटील चुयेकर, सचिन तोडकर यांनी उमेदवारीची मागणी केली. हॉटेल अयोध्या येथे मुलाखती झाल्या.
प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक यांनी मुलाखत घेतल्या. पहिल्यांदा इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती झाल्या.त्यानंतर संयुक्तपणे चर्चा झाली. यावेळी प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे म्हणाले, मुलाखत प्रक्रियैचा अहवाल प्रदेशकडे पाठविला जाईल. नंतर हा अहवाल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात येणार आहे.