कोल्हापूर : रशिया आणि युक्रेन युद्धासारख्या घडणाऱ्या जागतिक घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे. तिकडे जाण्याचा असलेला कल आणि परत येणाऱ्या मुलांचे भवितव्य पाहता भविष्यात मेडिकल व परामेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक संधींचा विस्तार होण्याची आवश्यकता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांनी मांडली.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ शनिवारी हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र- कुलगुरू डॉ. शिल्पा शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना डी.लिट. तर ख्यातनाम वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांना डी.एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले तर डॉ. धनाजी मालवेकर यांना एक्सलन्स इन रिसर्च म्हणून सन्मानित करण्यात आले.
अत्याधुनिक सुविधा देणार : डॉ संजय डी पाटील
अध्यक्षीय भाषणात कुलपती डॉ. संजय डी पाटील यांनी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांसह पदवी पदविका विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे कार्य करावे, आधुनिक ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वनस्पतीमुळेच मिळाली ओळख- डॉ. यादव
सत्काराला उत्तर देताना, यादव म्हणाले, शाहू नागरी जागतिक पातळीवरील मेडिकल हब म्हणून पुढे येण्यास डी.वाय. पाटील विद्यापीठाचे योगदान महत्वाचे आहे. कोल्हापुरात सर्व प्रकारची फुले, वनस्पती आढळतात. वनस्पती आहेत म्हणून मानवी जीवन आहे. वनस्पतींनीच मला ओळख दिली. वनस्पतीविना मानवी जीवन व प्रगती अशक्य आहे. विद्यापीठ संवर्धन मोहीम राबवतेय, त्याला इतरांनी ही हातभार लावा.
माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण : डॉ. जयसिंगराव पवार
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण आहे. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी हे पराक्रमी असूनही त्यांची म्हणावी तितकी दखल घेतली नाही, म्हणून त्यांच्यावर अभ्यास ठरवून केला. कोल्हापुरात कृष्णाबाई केलवळकर ही पहिली महिला शाहू महाराज यांच्यामुळे वैद्यकीय शिक्षणसाठी परदेशात गेली. राजाराम महाराज यांची दोन स्वप्ने, त्यातील एक शिवाजी विद्यापीठ स्थापना आणि दुसरे होते ते मेडिकल कॉलेज काढण्याचे. आणि हे दुसरे स्वप्न डॉ. डी. वाय पाटील यांनी पूर्ण केले.