गडहिंग्लज – कोल्हापूरातील रेल्वे सुरळीतपणे सुरु व्हावी यासाठी मी वारंवार अधिकाऱ्यांना सूचना करीत असतो. रेल्वेचे उदाहरण इतक्यासाठीच देत आहे की सध्या कोल्हापूर जिल्ह्यात समझोता एक्स्प्रेसची चर्चा आहे. या एक्स्प्रेसचा कोठे अपघात होऊ नये म्हणून मी सिग्नल दाखविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले.
ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे विविध संस्थांतर्फे सुवर्णमहोत्सवी वैवाहिक दाम्पत्यांचा सत्कार कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रा. मंडलिक बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंप्पी, वीरशैव बँकेचे संचालक सूर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रेखा कुराडे अध्यक्षस्थानी होत्या.
ईश्वरलिंग मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘सुसंस्कृत जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. आपण थोरामोठ्यांच्या, आई-वडीलांच्या संस्कारातून आयुष्यात उभारी घेत असतो. आई-वडीलांचा सांभाळ करणे व महिलांचा आदर करणे हे तर आपले कर्तव्यच आहे.’