मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आझाद मैदानातून मोर्चा काढलेला मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला. मोर्चा विधानभवनापर्यंत नेण्यासाठी आग्रही राहिल्याने पोलीसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, नितेश राणे आदी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून येलो गेट पोलीस ठाण्यात आणले होते.
राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही
दरम्यान, नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आझाद मैदानात भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. नवाब मलिकांच्या राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला. सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का ? अशी विचारणा त्यांनी केली.
दाऊदमुळे राजीनामा थांबला
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात २७ महिन्यात संजय राठोडांचा राजीनामा घेतला, अनिल देशमुखांवर ईडीने कारवाई केली त्यांचा राजीनामा घेतला. तसेच मलिकांवर कारवाई झाली त्यांचा राजीनामा मंजूर होणार होता, त्यांची जागा घेण्यासाठी नेताही तयार होता, पण त्यांचा दाऊदमुळे राजीनामा थांबला आहे.