पुणे : काळाच्या ओघात हळदीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राबरोबरच उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच हळद लागवडीपासून प्रक्रिया आणि त्यानंतर निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया उद्योग धोरण निश्चित करण्याासाठी एक समिती नेमली आहे.
त्यामुळे सर्व प्रक्रिया किंवा धोरण हा समितीच ठरविणार नाही तर यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कृषितज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांना देखील सहभाग नोंदवता येणार आहे. यामुळे सर्वाच्या विचारांची देवाण-घेवाण करुन हळद उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. आशा प्रकारे सूचना घेऊन धोरण ठरवण्याची ही पहिलीच वेळ असून अंतिम टप्प्यात नेमके काय हाती लागणार हे देखील पहावे लागणार आहे.समिती स्थापनेचा नेमका उद्देश काय ?राज्यात हळदीचे क्षेत्र हे वाढलेले आहे.
पण त्या तुलनेत प्रक्रिया उद्योगाची माहिती नसल्याने उत्पन्नात वाढ झालेली नाही. हळद लागवडीपासूनची प्रक्रिया आणि विक्रीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संशोधन प्रक्रिया धोरण हे निश्चित केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोरील समस्यांवर उपाययोजना काय याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये समिती आणि सर्वासामान्य शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार केला जाणार असून कृषी विभागाच्या माध्यमातून ते प्रसिध्द देखील केले जाणार आहे.