मुंबई: मुंबईचे कमाल तापमान सातत्याने चढेच नोंदविण्यात येत असून तापमान वाढीमुळे मुंबईकर हैरान झाले आहेत. अनेक जण घरातच राहण्यास पसंती देत आहेत.
दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, वाढते तापमान धोकादायक पातळीकडे वाटचाल करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हे असेच सुरू राहिल्यास आणि समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवदळासारखी संकटे येऊ शकतात अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत राहिली तर, 2050 पर्यंत तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल असा अंदाज इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालात म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात पुराचा धोका कमी करणे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून संरक्षण करणे याकडे लक्ष दिले जात आहे. परंतु तरी देखील याचा भरती ओहोटी क्षेत्रातील प्राणी वनस्पती आणि मासेमारीला धोका पोहोचू शकतो. दुसरीकडे जागतिक ताममानवाढीमुळे मुंबईत येणाऱ्या मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या चक्रीवादळात वाढ होऊ शकते अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भविष्यात मुंबईला चक्रीवादळाचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवणार असून, मान्सूनपूर्व आणि नंतर दोन्ही चक्रीवादळात वाढ होईल. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांना वाढत्या समुद्रपातळीचा मोठा धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.