विधानसभाध्यक्ष निवडीची तारीख द्या; १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घ्या !

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या, तसेच बारा आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर घ्यावा, अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मागील अधिवेशन हे फक्त पाच दिवसाचे होते. आता अर्थसंकल्प अधिवेशन २५ मार्चपर्यंत जाहीर झालेले आहे. या कालावधीत विधानसभा अध्यक्ष पद रिक्त ठेवणे योग्य नाही. त्यासाठी एक तारीख द्यावी अशी विनंती केली असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, याच भेटीत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न गेले वर्षभर प्रलंबित आहे तो सोडवावा याची आठवणही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करून दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. गैरवर्तनाबद्दल भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी सभागृहाने निलंबित केले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सहा महिन्याच्यावर सदस्यांना निलंबित ठेवता येत नाही असा निर्णय दिला होता त्या निर्णयाचा आधार घेऊन तशापध्दतीने या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांना नियुक्त न करणे म्हणजे ज्या लोकांचे नेतृत्व ते करतात त्यांच्यावर अन्याय आहे. त्या निकालाचा आधार घेऊन हे नियुक्त प्रकरण संपवा असे राज्यपाल यांना सांगितले आहे.