कोल्हापूर : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यांपासून संप सुरू आहे. संपामुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त असतानाच आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. परीक्षा काळात तरी बससेवा सुरळीत होणार का? या चिंतेत विद्यार्थ्यांसह पालकवर्ग आहे.
राज्य एस. टी महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी अजूनही संपात सहभागी आहेत. त्यामुळे एसटी बस अजूनही आगारातच थांबून आहेत. तुरळक प्रमाणात गाड्या धावत आहेत. काही आगारांनी उत्पन्नाचा विचार करून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लालपरीचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. आता परीक्षांचा काळ सुरू होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बसचाच आधार असतो. मात्र आता त्यांची मोठी अडचण होणार आहे. आता त्यांना खासगी प्रवासी वाहतूक म्हणजेच वडापचा आधार घ्यावा, लागणार आहे.