कोल्हापूर : पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे.याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत झाडाझडती घेतली. पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश मंत्री ठाकरे यांनी प्रदूषण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पंचगंगा प्रदूषणाचा विषय नवीन नाही, दरवर्षी उन्हाळ्यात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. कोल्हापूर महापालिकेसह नदीकाठची गावे, कारखान्याचे दूषित पाणी थेट नदीत मिसळते आणि त्यातून पंचगंगा प्रदूषित होते. गेली चार-पाच दिवस पंचगंगेत मृत माशांचा अक्षरश: खच पडला आहे.
मृत मासे रुई बंधाऱ्यापर्यंत वाहत गेले आहेत. परिणामी नदीकाठावरील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत कोल्हापुरातील सामाजिक संघटनांनी प्रदूषण मंडळाला धारेवर धरल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने संबंधित घटकांना नोटिसा पाठवल्या आहेत.याबाबत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी, जिल्ह्यातील ३९ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते यासाठी बारा ठिकाणी क्लस्टर केले असून प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.
कोल्हापूर महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभी केली आहेत, मात्र त्याची क्षमता वाढविण्याची गरज असून त्यासाठी निधी हवा असल्याचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सांगितले, पंचगंगा प्रदूषणाचा विषय गंभीर असून प्रादेशिक कार्यालयाने पाठविलेल्या अहवालानुसार संबंधित घटकांवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री ठाकरे यांनी बैठकीत दिले. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, प्रमोद माने आदी उपस्थित होते.