मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत असून त्याआधी राज्यातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यातच संध्याकाळी उशिरा सत्ताधारी पक्षाच्या झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर परखड शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे.
“३० वर्ष सापाच्या पिलाला दूध पाजलं, ते वळवळ करत होतं, आता आमच्यावरच फुत्कारतंय”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाला सुनावलं आहे.देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांना झालेली अटक आणि दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत त्यांनी केलेला जागेचा व्यवहार यावरून निशाणा साधला होता. त्यावरूनच आता मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. “सध्या देशात एक घृणास्पद राजकारण सुरू आहे. तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही तुम्ही? पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग तुम्ही दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीमध्ये बोलताना उपस्थित केला आहे.