अधिवेशन वादळी होणार; सत्ताधारी-विरोधक भिडणार !

मुंबई (प्रतिनिधी) : विधीमंडळाचे आजपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजप एकमेकांना भिडण्याच्या तयारीत आहेत. त्याची व्यूहरचना दोन्ही बाजूकडून जोरदारपणे करण्यात आली आहे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. अधिवेशनात त्यांच्या राजीनाम्यावरून सरकारला घेरण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. तर विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी राजीनामा नाही, असे सरकारकडून ठणकावून सांगण्यात आले असून मलिक यांच्या बचावासाठी महाविकास आघाडी सरकार सरसावले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधक यांच्या बैठका झाल्या.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची बैठक झाली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. पण आम्हाला चर्चेत रस असून अनेक मुद्दे मांडणार आहोत. चर्चा सुद्धा करणार. शेतकरी हवालदिल आहे, पण त्याची वीज कापली जाते आहे. अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कोणी ऐकत नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत विरोधकांचे हल्ले जोरकसपणे परतवून लावण्याचा निर्धार करण्यात आला. तर सायंकाळी आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.