मुंबई: मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने केवळ मराठा समाजासाठी स्वतंत्र मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य सरकार व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांची तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.