कोल्हापूर : शेतीसाठी सलग दहा तास द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार, व संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून अज्ञात शेतकऱ्यांनी कागल येथील महावितरणाच्या कार्यालयाला आग लावली.
आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने कागल येथील छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आगीत काही कागदपत्रं जळून खाक झाली आहेत. दरम्यान, “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा,” संघटनेच्या ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आला असून आग लावल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.