तिरुपती : आंध्र प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संख्येने आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनासाठी येत आहे.त्यामुळे देवस्थानाने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी आता दर्शनासाठी ज्यादा स्लॉटेड सर्व दर्शन टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या काळात तिरुपती देवस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जवळपास ५० टक्क्यांनी वाढली आहे.
१ फेब्रुवारी रोजी जवळपास २९ हजार भविकांनी दर्शन घेतले तर २१ फेब्रुवारीला ही संख्या ३९ हजारांच्या फार गेली आहे.तिरुमाला तिरुपती मंदिरातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता देवस्थानाने २४ ते २८ फेब्रुवारीसाठी प्रतिदिन १३ हजार तिकिटांचा अतिरिक्त कोटा जारी केला आहे. २४ ते २८ फेब्रुवारीसाठी टीटीडी भूदेवी कॉम्प्लेक्स, श्रीनिवासम कॉम्प्लेक्स आणि श्री गोविंदराजा स्वामी चूल्ट्रीमध्ये प्रति दिन ५ हजार SSD टोकनचा अतिरिक्त ऑफलाईन कोटा जारी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे मार्च महिन्यातही प्रतिदिन २५ हजाराच्या हिशोबाने ३०० रुपये तिकिटाचा ऑनलाईन कोटा जारी केला जाणार आहे. एका दिवशी २० हजार SSD तिकिट ऑफलाईन जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकंदरीतच कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर तिरुमाला तिरुपती देवस्थान पूर्वपदावर येत आहे. भाविकांची वाढती गर्दी पाहता देवस्थानाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.