सोलापुर: सोलापुरात नुकतंच एका भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या राजकीय प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे रात्री १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पक्षप्रवेश करण्यासाठी या भाजपा नेत्याला तब्बल पाच तास वाट पहावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपाचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांना तब्बल पाच तास वाट पहावी लागली. जयंत पाटील पोहोचल्यानंतर रात्री १२ वाजता हा पक्षप्रवेश पार पडला आणि अखेर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाले. सोलापुरातील बाळे येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.झालं असं की, सांगलीचे वीर जवान शाहिद रोमित चव्हाण यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार पार पडले. या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याने जयंत पाटील यांना उशीर झाला आणि सोलापूर दौऱ्यातील सर्व कार्यक्रम उशिरा पार पडले.
यासंबंधी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, “भाजपातून काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. त्यांनी मला येथे येण्यासाठी विनंती केली होती. पण माझ्या मतदारसंघातील एका जवानाला वीरमरण आलं आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावल्याने मला येथे येण्यास उशीर झाला. ७ वाजताच हा कार्यक्रम होणार होता, पण उशीर झाला”