वर्धा : या वर्षी झालेला अवकाळी पाऊस आणि काही दिवस थंडी पडल्यामुळे मिरची पिकांवर अज्ञात रोगाने हल्ला केल्याने उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे.
त्यामुळे, आंधप्रदेश आणि तेलंगणातून येणारी मिरची विदर्भात किलोमागे ४० ते ५० रुपयाने वाढल्याने ग्राहकांना चांगलाच झटका मिळत आहे. या वर्षी अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कपाशीचे आणि तूर, भाजीपाला पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
विदर्भात हवे तसे लाल मिरचीचे उत्पादन घेतले जात नाही. जालना, आंधप्रदेश आणि तेलंगणात मध्ये मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेतले जाते. मात्र, या वर्षी भरपूर पाऊस आणि थंडीमुळे मिरची पिकावर रोगाने हल्ला चढविला आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट निर्माण झाली. बाहेर राज्यातून येणारा मिरचीचा साठा या वर्षी भाववाढीमुळे कमी प्रमाणात येत असल्याचे व्यापा-यांनी सांगितले आहे.