आज पुन्हा एकदा पन्हाळा तालुक्यात गव्यांचे दर्शन

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आज पुन्हा एकदा गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले.दिवसाढवळ्या एका पाठोपाठ एक असे 30 हुन अधिक गवे पहायला मिळाले आहेत.

पहिल्यांदाच एवढा मोठा गवांचा कळप दिसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पन्हाळा तालुक्यातील वाघवे पैकी खोतवाडी या परिसरात गव्यांचे दर्शन झाले आहे. राधानगरी- आजरा परिसरातील अभयारण्यात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. दाजीपूर हे गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य आहे. त्यामुळे अनेकवेळा हे गवे बाहेर पडतात असे वनविभागानेही सांगितले आहे.

या भागात वारंवार गव्यांचे दर्शन होते. मात्र यावेळी पन्हाळा तालुक्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कळपाने गवे एकाचवेळी दिसले आहेत. दरम्यान, शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी गव्यांना जंगलाच्या दिशेने उसकवून लावले आहेत.