कोल्हापूर : खासदार संभाजी छत्रपती यांचा आज जन्मदिन असून खासदार तथा त्यांचे बंधू छत्रपती उदयनराजे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
आमचे बंधू छत्रपती उदयनराजे यांनी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचे मन:पूर्वक आभार. श्री शिवछत्रपती महाराजांची वंशपरंपरा असणाऱ्या कोल्हापूर व सातारच्या गादीचे ऋणानुबंध आजही आम्ही तितक्याच आपुलकीने जोपासतो”, असे ट्वीट संभाजी छत्रपती यांनी केले आहे.“आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री शिछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे”, असेही त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
तसेच जन्मदिनानिमित त्यांनी दिल्ली येथील संसद भवनाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारकास अभिवादन करून आशीर्वाद घेतले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाच्या सर्वोच्च सभागृहात फक्त आणि फक्त छत्रपती घराण्यातील श्री शिवाजी महाराज व शाहू महाराज या दोन युगपुरूष लोकराजांची स्मारके उभारण्यात आली आहेत. आणि या राज्यकर्त्या महापुरूषांचा मी वंशज आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.