कोल्हापूर : छातीत तसेच पाठीचा त्रास सुरू झाल्याने आमदार नितेश राणे यांना काल उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरात हलविण्यात आले. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना येथील ‘आयसीयू’मध्ये हलविण्यात आले आहे.
तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी दिली. राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ञांचा यामध्ये समावेश केलेला आहे.
आज दुपारपर्यंत चाचण्यांचे अहवाल येणार :दरम्यान, नितेश राणे यांना काल (सोमवारी) कोल्हापूरातील सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर विविध चाचण्या करण्यात आल्या. सीपीआरमधील तुळशी इमारती मध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील चाचण्यांसाठी आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांच्या पाठीमध्ये तसेच छातीमध्ये त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे अहवाल आज दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.