वारणानगर : पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे अवैद्य दारू धंद्यांना ऊत आला असून शाळा ,अंगणवाडी ,सेवा सोसायटी, दूध संस्था ,ग्रामपंचायत परिसर यासारख्या सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे अवैध दारू विक्री केली जात असल्याने महिला वर्गासह सर्वसामान्य जनतेला प्रचंड उपद्रव होत असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते फत्तेसिंग राजाराम खोत यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दिली आहे.
जाखले गावात ही चोरटी दारू विक्री ग्रामपंचायतीपासून अवघ्या ३० फुटावर दुकान ,शाळा अंगणवाडी जवळ ,विविध सहकारी संस्था परिसरात भरवस्तीत, आणि चक्क गणपती मंदिरासमोरच हे अवैध दारू धंद्याचे मायाजाल प्रचंड फोफावले आहे. कित्येक वर्षांपासून कोडोली पोलीसांच्या राजाश्रयाखाली हा अवैध दारू धंदा चांगलाच फोफावला आहे. छोट्याशा या गावात भोलानाथ गायकवाड, शिवाजी बोराटे, जगन्नाथ धोंगडे ,काकासो चौगले ,मंगल चौगले या इसमांची एकुण पाच अवैध दारू विक्रीची दुकाने राजरोसपणे चालवली जातात. यामागे काही पत्रकारांचेही पडद्यामागे हात असल्याने या अवैध दारू धंद्याला आजवर कोणीही थोपवू शकलेले नाही. शाळा ,अंगणवाडी ,सेवा संस्था, दुध संस्था ,ग्रामपंचायत परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी अशा अवैध व्यवसायांना बंदी असतानाही ग्रामपंचायत प्रशासन सुध्दा जाणीवपूर्वक डोळेझाक करताना दिसत आहे.फत्तेसिंग खोत व अन्य काही कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन याबाबतची पुर्वकल्पना देण्यासाठी गावचे सरपंच व पोलीस पाटील यांच्यासह कोडोली पोलीसात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत पोलीस यंत्रणा देखील कोणाच्या तरी दबावाखाली या अवैध धंदेवाल्यानांच पाठीशी घालतांना दिसत असल्याचे चित्र आहे.याअवैध दारू धंद्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याबाबत कोडोली पोलीसांसह ,जिल्हा पोलीस प्रशासनाला देखील तक्रार दिली आहे. सर्व सामान्य जनता आणि महिला वर्गातून ही दारू विक्री दुकाने बंद करण्यासाठी तिव्र विरोध दर्शवला जात आहे.हे अवैध दारू विक्रीचे अड्डे लवकरात लवकर बंद नाही झाले तर याबाबत तिव्र आंदोलन करण्याचा इशारा फत्तेसिंग राजाराम खोत यांनी दिला आहे.