वडणगेकरांचा हद्दवाढ विरोधात रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढा…..

वडणगे : हद्दवाढ विरोधात रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढा देण्याचा निर्धार वडणगे ता. करवीर येथे पार्वती मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास पोवार होते. हद्दवाढीसंदर्भात शुक्रवारी सर्वपक्षीय समिती व ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी रवी बिरजे म्हणाले, कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होईपर्यंत हद्दवाढ होणे अशक्य आहे. मात्र हद्दवाढ ही धोक्याची घंटा आहे. त्याकरिता गाफील राहून चालणार नाही. वेळप्रसंगी याचिका दाखल करून न्यायालयीन लढ्याची तयारी सुरू ठेवू या. सरपंच सचिन चौगुले म्हणाले, हद्दवाढीसाठी नेतेमंडळी प्रतिकूल आहेत. हद्दवाढ झाल्यास होणारी करवाढ जनतेला परवडणारी नाही. महापालिकेचे कारभारी शेतकऱ्यांना भूमिहीन करतील. त्यामुळे हद्दवाढीविरोधात न्यायालय आणि रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहिले पाहिजे. हद्दवाढीसाठी आग्रह धरणारे कोल्हापुरातील नागरिकांना काय सुविधा देतात, असा सवाल विलास पोवार यांनी उपस्थित केला. हद्दवाढीला संघटित, असंघटित आणि राजकीय लढा देण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी निषेधाचे फलक लावून व्यापक जनजागृती करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य महादेव नरके म्हणाले, ग्रामीण जनतेकडूनही शहरातील लोकांचा फायदा होत आहे. सर्व सेवा असताना हद्दवाढीची गरजच काय, असे त्यांनी ठणकावून सांगितले. आम्हाला शहरात यायचे नाही तर चर्चा कशाला करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.