कोल्हापूर : राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत येत्या जूनमध्ये संपत आहे. भाजप त्यांना पुन्हा याच पदावर संधी देण्याची शक्यता फारच धूसर आहे.
मराठा आरक्षणाचा विषय व मराठा समाजात त्यांच्याबद्दल क्रेझ असल्याने दोन्ही काँग्रेस त्यांच्या बऱ्यापैकी संपर्कात असून, ते स्वत:ही या पक्षांच्या गुडबुकमध्ये आहेत. त्यांची यापुढील राजकीय वाटचाल पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबतच व्हावी, असा छत्रपती घराण्याचाही आग्रह आहे.संभाजीराजे यांची ११ जून २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खासदार म्हणून नियुक्ती केली. केंद्रातील भाजप सरकारने त्यांना हा बहुमान दिला. थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांच्या लोकप्रियतेचा पक्षाच्या विस्तारासाठी उपयोग होईल, असा विचार करून त्यांना खासदार केले.परंतु, संभाजीराजे हे कधीच भाजपच्या पक्षीय चौकटीत अडकले नाहीत. आपल्याला मिळालेली खासदारकी ही भाजप सरकारने दिली हे मान्य करूनही तो शाहू घराण्याचा सन्मान म्हणून दिली असल्याची त्यांची भूमिका राहिली. त्यामुळे ते कधीच भाजपचे मांडलिक झाले नाहीत. कोणत्याही निवडणुकीत ते भाजपला मते द्या म्हणून सांगायला गेले नाहीत. मागील सहा वर्षांत तसे ते प्रमुख चार पक्षांसोबत समान अंतर ठेवून राजकीय व्यवहार करत आले आहेत.