सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्यांचे रडगाणे वर्षानुवर्षे कायम आहे. कोल्हापूर मिरज, सांगली या महत्त्वाच्या स्थानकांच्या समस्यांवर अर्थसंकल्पात दिलासा देण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्या लोकप्रतिनिधी दिल्लीत ठासून मांडत नाहीत. कोल्हापूरकर नेते फक्त कोल्हापूरपुरतेच पाहतात. सांगलीकर नेत्यांना रेल्वे आपलीशी कधीच वाटलेली नाही. याचा गैरफायदा रेल्वेच्या परप्रांतीय वरिष्ठांनी नेहमीच घेतला आहे. साधे ग्रुप बुकींग करायचे म्हटले, तरी पुण्याला जावे लागते. सांगलीत फलाटांची संख्या वाढवावी, पीटलाईन सुरू करावी, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात या मागण्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहेत.जम्मू-तावी-पुणे झेलम एक्सप्रेस मिरजेपर्यंत विस्तारीत करावी, सोलापूर-मिरज एक्सप्रेस साताऱ्यापर्यंत वाढवावी, उत्तर भारतासाठी एक्सप्रेसची संख्या वाढवावी, मुंबईसाठी दिवसा आणखी एक एक्सप्रेस सुरू करावी अशा अनेक मागण्यांची जंत्री रेल्वेकडे पडून आहे. विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकात त्यावर चर्चा होतात. निर्णय मात्र काहीच नाही.