कोल्हापूर : जागा मिळेल तेथे पार्किंग, अशी कोल्हापूर शहरात परिस्थिती असून वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शहराचा मुख्य भाग असो वा उपनगराचा परिसर रस्त्यावर हमखास उभी असलेली वाहने सर्रास पाहावयास मिळतात. अनेक मिळकतींना पार्किंगची सुविधाच नाही. परिणामी, येथील वाहने थेट रस्त्यावरच पार्किंग केली जातात. मुख्य भागातच बाजार पेठ, व्यापार पेठ, बँका, विविध संस्था आणि शासकीय कार्यालये आहेत. येथे दिवसभर नागरिकांची गर्दी असते. त्यांच्यासमोर वाहने कोठे पार्किंग करायची हा दिव्य प्रश्न असतो. त्यामुळे नागरिकांना मिळेल त्या जागी वाहने पार्किंग करण्याशिवाय गत्यंतर नसते. बेशिस्त पार्किंग अंतर्गत त्यांची गाडी वाहतूक शाखेच्या क्रेनच्या अगर जामरच्या तावडीत सापडते.शहरात पर्यटकांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे बिंदू चौकातील पार्किंग लवकर हाऊसफुल्ल होते. दसरा चौक मैदान पार्किंगसाठी खुले आहे; पण तेथील वाहन क्षमताही मर्यादित आहे. परंतु, काही चालक अंबाबाई मंदिरापासून हे स्थळ थोडे दूर असल्याची कारणे देत येथे पार्किंगला पसंती देत नाहीत.