इचलकरंजी शहरातील मोठे तळे हा ऐतिहासिक ठेवा उघड होणार

इचलकरंजी: इचलकरंजी शहराचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या काळात शहरातील पाणी पुरवठा करत असलेल्या मोठ्या तळ्याचा ऐतिहासिक ठेवा पूर्ववत उघड होण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने आज गुरुवार दिनांक २७ जानेवारी पासून लोकसहभागातून या कामाची सुरुवात केली. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांच्या संकल्पनेतून हा ऐतिहासिक ठेवा सुशोभीकरण व विविध आवश्यक कामासह लवकरच नजीकच्या काळात शहरवासीयांना पाहता येईल. “हात द्या,साथ द्या मोठे तळे संवर्धनास दाद द्या” ही टॅग लाईन अधोरेखित करून इचलकरंजी नगरपरिषदेने शहरातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, मक्तेदार यांना लोकसहभागासाठी केलेल्या आवाहनानुसार आज इम्तियाज अपराद, बाळु तेजी, दीपक कुरकुटे, राजू चौधरी, बालाजी हुलेमनी, अवधूत मुडशिंगकर या नगर परिषदेच्या मक्तेदारांनी मोठे तळे संवर्धनाच्या कामासाठी जेसीबी मशीन, ट्रॅक्टर, ट्राली या मशीन व वाहनांसह आपले श्रमदान व योगदान दिले.

याचप्रमाणे दररोजच विविध मक्तेदार,संस्था यांच्या योगदानातून मोठे तळे पुनर्जीवन करणे या कामाची संकल्प सिद्धी लवकरच पूर्णत्वास येईल असा मनोदय नगर अभियंता संजय बागडे यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगरअभियंता भागवत सांगोलकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, जल अभियंता सुभाष देशपांडे, शाखा अभियंता सुर्यकांत कोरे, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र गवळी, राधिका हावळ, प्रविण बैले , मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, संपत चव्हाण, संजय कांबळे,पर्यवेक्षक आदित्य आरेकर, तसेच मक्तेदार नितेश पाटणी, ज्योतीराम बरगे, हणमंत चव्हाण, प्रिया नाईक आदी उपस्थित होते.