मुंबई :- साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. अवचट यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवासात आपल्या अनोख्या लेखनशैलीची महत्वपूर्ण अशी भर घातली. त्याचबरोबरीने त्यांनी सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळीतही हिरीरीने सहभाग घेतला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी संस्थात्मक आणि भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.