नवी दिल्ली : सध्या देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने चांगलाच धुमाकूळ घाटल आहे. ओमायक्रॉनविषयी रोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. कोविड-19 वर एका कार्यक्रमाला संबोधित करताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनीही ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
त्या म्हणाल्या की, करोनाचा नवा आणि वेगाने पसरणारा व्हेरियंट ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कमी गंभीर असला, तरिही तो धोकादायक आहे.ओमायक्रॉन डेल्टाहून कमी धोकादायक असूनही लोक रुग्णालयात का दाखल होत आहेत, तसेच या व्हायरसमुळे रुग्णांचा मृत्यू का होत आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. केरखोव्ह म्हणाल्या की, जगभरात ओमायक्रॉनवर होणाऱ्या संशोधनातून आणि निरीक्षणातून निष्पन्न होत आहे की, ओमिक्रॉन रोग प्रतिकारशक्ती कमी करू शकतो.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘नव्या व्हेरियंटवर होणाऱ्या संशोधनावरुन, ओमिक्रॉन व्हेरियंट संसर्ग गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी, वृद्धांसाठी किंवा लसीकरण न केलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरु शकतो.’ जगात प्रत्येकाला ओमायक्रॉनची लागण होणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. केरखोव्ह म्हणाल्या की, ‘ओमायक्रॉनचा संसर्ग इतर कोणत्याही व्हेरियंटपेक्षा अधिक वेगानं होतो. त्यामुळे सर्वांनाच याची लागण होणं, यामध्ये नवं काहीही नाही. या व्हेरियंटची अगदी सहज सर्वांना लागण होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले.