मल्हारपेठ : कोयना नदीच्या गढूळ पाण्याचे ग्रहण संपता संपेना, अशी स्थिती आहे. नदीकाठच्या गावांना जानेवारी महिन्यातही गढूळ पाणी प्यावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे अगोदरच आजारानेच डोके वर काढले असून त्यातच गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने आजारात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मध्यंतरीच्या ढगफुटीसदृश पावसामुळे ओढे, नाले, दुथडी भरून वाहिले. अनेक ठिकाणी डोंगर उतारावरील गावात भूस्खलन झाले. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन अनेक नागरिकांना जिवास मुकावे लागले.भूस्खलनाचे गाळमिश्रित पाणी साठल्याने कोयना धरणातून पाणी सोडल्याने गाळासकट पाणी नदीत येत आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी दिसत आहे. भूस्खलनामुळे खूप गाळ धरणात साठल्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, पोटाचे विकार सुरू झाले आहेत. त्यातच सध्या कोरोनाचेही रुग्ण वाढले आहेत. मल्हारपेठ, नवारस्ता, पाटण येथील खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून भीती वाढत आहे.