तीन महिन्यात 150 लाख टन साखरेचे उत्पादन

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. या दरम्यानच्या काळात इतर पिकांचे अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले असले तरी ऊस उत्पादकांना गाळपातून मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्याच्यान कालावधीत गाळपातून देशात 150 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यामध्ये 10 लाखाने वाढ झाली आहे. तर आतापर्यंत 17 लाख टन साखरेची निर्यात झाली आहे.

या सबंध साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र राज्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. कारण एकूण साखरेच्या उत्पादनापैकी 58 लाख टन साखरेचे उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून झालेले आहे. त्यामुळे रेशीम उद्योग आणि दुसरीकडे साखर उद्योगामध्ये देशात महाराष्ट्राची सरशी आहे.

महिन्याभरापासून निर्यातीचे करार मंदावले

गाळप हंगाम सुरु झाले की पहिल्या दोन महिन्यांमध्येच साखर निर्यातीचे झालेले करार साखर कारखान्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या करारामुळेच आतापर्यंत 17 लाख टन साखर ही निर्यात झाली आहे. तर जानेवारीपर्यंत 7 लाख टन साखर निर्यात होईल असे सांगण्यात आले आहे. यंदा साखर उद्योगासाठी सर्वकाही पोषक आहे. कारण गतवर्षीच्या तुलनेत 4 लाख टन साखर अधिकची निर्यात झाली आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी झाल्याने करारही मंदावले आहेत. मात्र, हीच परस्थिती भविष्यात दर वाढतील अन् यंदा देशभरातून विक्रमी निर्यात होणार आहे.