7 वी पर्यतच्या शाळांमधील वर्ग आता 12 वी पर्यंत वाढणार

अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची 12 वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहे, अशा शाळांमधील वर्गवाढीस मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजासंदर्भात शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.