मुंबईत रुग्णसंख्या चा आलेख खाली

मुंबई : मुंबईत तिसरी लाट आता ओसरायला सुरुवात झाली असून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सहा हजारापर्यंत खाली आला आहे.

शहरात १ जानेवारीला पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. जवळपास तीन आठवडय़ातच उच्चांक गाठलेली ही लाट त्याच वेगाने ओसरत आहे.मुंबईत २१ डिसेंबरपासून वेगाने वाढत असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने जानेवारीच्या दुसऱ्याच आठवडय़ात २० हजारांच्या घरात पोहोचली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही जवळपास एक लाखांच्याही वर गेली. परंतु जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उताराला लागल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारापर्यंत कमी झाली आहे. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्याही ५० हजारापर्यंत खाली आली आहे. शहरात ५० हजार उपचाराधीन रुग्ण जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होते. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे प्रतिबंधित इमारतींच्या संख्येतही घट होत असून सध्या शहरात ५२ इमारती प्रतिबंधित आहेत, तर एकही चाळ किंवा झोपडपट्टी प्रतिबंधित नाही.